आळंदी (वार्ताहर): आळंदी पोलीस स्टेशन येथे रेझिंग डे / पोलीस सप्ताह च्या अनुषंगाने दिनांक ०४/०१/२०२३ रोजी १२.०० वा ते १४.०० वा. दरम्यान आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथील इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाणे संबंधित कामकाजाबाबत, पोलीस ठाणे अंमलदार कक्ष, पासपोर्ट विभाग, लॉक ऑफ गार्ड, सीसीटीएनएस, वायरलेस सेट, वाॅकी – टाॅकी, क्राईम रूम व गुन्ह्यांबाबत तसेच पोलीस विभागातील शस्त्रास्त्र दाखवून त्यांची नावे व त्यांच्या वापराविषयी माहिती देण्यात आली.
त्याचबरोबर मुलींनी कोणी छेड – छाड करत असेल त्यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी घ्यावयाची दक्षता व मुलीविषयीचे कायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच घटनास्थळी लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी वापरावयाच्या (१००, ११२) नं. विषयी माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमाकरिता १०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना व्यसनापासून व गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा संदेश दिला. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक जोंधळे साहेब, मच्छिंद्र शेंडे साहेब समवेत इतर सहकारी उपस्थित होते.




