वडगाव मावळ: राष्ट्रवादी महिला काँग्रेसने सुरू केलेल्या जनजागर यात्रेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. दिवसेंदिवस वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मावळ तालुक्यात श्री क्षेत्र देहू ते लोणावळा मार्गावरून ही यात्रा संपन्न झाली. त्याचवेळी यात्रेचे वडगाव मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.
सरकारच्या जाचक धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. जीवनावश्यक गोष्टींची मोठ्या प्रमाणावर होत असलेली महागाई महिला वर्गाला कळत असून त्याचा त्रास देखील होत आहे. ह्या जनजागर यात्रेत प्रामुख्याने महागाईच्या विरोधात, बेरोजगारी विरोधात, वेतन, बेताल वक्तव्य, शेतकरी असंतोष, महिला सुरक्षा, अशा सर्व विषयांवर यल्गार करण्यात आला. वाढत असलेल्या घरघुती गॅस, पेट्रोल डिझेल च्या किंमती वर आवाज उठवण्यात आला.
यावेळी आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी तालुका अध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, जि.नि.समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, कार्याध्यक्ष ओबीसी सेल अतुल राऊत, तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, ॲड.रुपाली दाभाडे, शितल हगवणे, पुष्पा घोजगे, संध्या थोरात, वर्षाताई नवघणे, तसेच सर्व शहरांचे अध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना विद्या चव्हाण म्हणल्या की, मोदी सरकार आल्यापासून सरकार विरुद्ध आवाज उठवणाऱ्या मीडियाचा आवाज दाबला जातोय ही मोदींची हुकूमशाही चालू आहे. प्रचंड महागाई वाढली असून भाजीपाला तसेच घरघुती गॅस ४०० वरून १२०० झाला. पेट्रोल डिझेल चे भाव ६० वरून १२० झाले. ह्या महागाई विरोधात महिलांना राग आला पाहिजे त्यांनी रस्त्यावर उतरून मोदींनी ह्या बाबत जाब विचारायला हवा अशा भावना व्यक्त केल्या.
आमदार सुनिल शेळके बोलले की, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आता वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी यावर लक्ष दिले पाहिजे. महागाई वरचे लक्ष विचलित करण्यासाठी महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून जनतेची दिशा भूल करण्याचे काम चालू आहे. बेरोजगारी वाढत असून राज्यातले प्रकल्प बाहेर चाले आहेत मावळातील वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. विधिमंडळात महागाई बेरोजगारी ह्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या नावाने सरकारी जमीन पुर्वसनाच्या नावाने लाटून मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचार चालू असल्याचे यावेळी सांगितले. तसेच हे सरकार फक्त ४० आमदारांना सांभाळण्यासाठी चालू आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी वडगाव शहरात मोर्चाचे जोरदार स्वागत झाले. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.




