वडगाव मावळ:- मावळ तालुक्यातील पडवळ वस्ती नवलाख उंब्रे येथे गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत बैलगाडा शर्यतीचे ३ बैल जळून खाक झाले. यात २ बैल गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१०) जानेवारी रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास पडवळ वस्ती नवलाख उंब्रे ता. मावळ जि. पुणे येथे घडली. या घटनेची माहिती वैभव पडवळ यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बैलगाडा मालक तानाजी बबन पडवळ यांच्या घराजवळील गोठ्याला अचानक मध्यरात्री लागली. या लागलेल्या आगीत त्यांची ५ जनावरे जळाली आहेत. यात बैलगाड्याची तीन जनावरे जागीच जळून खाक झाली तर दोन बैलगाड्याची बैल गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. जखमी बैलावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
बैलगाड्याच्या बैलाचा गाडा मालक स्वतः च्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करत असतो. याच बैलांनी पुणे जिल्ह्यात शर्यतीत अनेक वेळा प्रथम क्रमांक मिळविला आहे. बैलाच्या आठवणीमुळे या शेतकऱ्याच्या घरातील लहानथोर दुःखी आहेत.
सोमवारी (दि.९) शेतकऱ्याने याच बैलांसोबत एकत्र फोटो काढले होते. ते फोटो केवळ आज आठवणी मध्ये राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. ह्या घडलेल्या घटनेमुळे परिसरातील बैलगाडा चालक, मालक व शौकीन घटनास्थळी भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत. प्रशासनाच्या वतीने या शेतकऱ्याला तातडीची मदत – देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. हे भीषण दृश्य पाहिल्यावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. एका बैलाची लाखो रुपये किंमत असल्याने पाच बैलाचे लाखों चे नुकसान झाले आहे.
त्यातच या परिसरातील वीज पुरवठा खंडित असल्याने आगीत जळत असलेल्या बैलांना वाचविता आले नसल्याचे शेतकरी तानाजी बबन पडवळ यांनी सांगितले. घटनास्थळी सहाय्यक फौजदार विजय चासकर, बाळू किरवे व पोलीस हवालदार सीताराम भवारी आदींनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. आगीचे नेमकं कारण अद्यापही कळले नसून पुढील तपास सहाय्यक फौजदार बाळू किरवे करत आहेत.




