- दीड महिन्यापूर्वी केला होता खून पोलीस चौकीसमोर माथाडीचे कार्यालय सुरु केले तरीही पोलिसांना आरोपी दिसेना
पिंपरी : पूर्ववैमनस्य आणि व्यावसायिक स्पर्धेतून १८ जणांनी विशाल नागू गायकवाड या तरुणावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा निर्घृणपणे खून केला. ही घटना २ डिसेंबर रोजी भर दिवसा परशुराम चौक, चिंचवड येथे घडली. घटना घडून दीड महिन्यांचा कालावधी उलटला मात्र पोलिसांनी मुख्य आरोपीला अजूनही अटक केलेली नाही. विशेष म्हणजे या आरोपीने मोहननगर पोलीस चौकीसमोर माथाडीचे कार्यालय सुरु केले आहे. तरीही पोलिसांची नजर त्या आरोपीवर जात नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दाद्या उर्फ विशाल मरिबा कांबळे, राजू मरिबा कांबळे, सिद्धया मरिबा कांबळे, कच्चा उर्फ मिलिंद मरिबा कांबळे (सर्व रा. फुलेनगर, चिंचवड), विशाल लष्करे (रा. रामनगर, चिंचवड), करण उर्फ ससा, सीजे उर्फ चैतन्य जावीर, ओमकार शिंदे, यश कुसाळकर, करण गायकवाड, रोहित मांजरेकर, सुरज मोहिते, निलेश लष्करे, बालाजी कोकाटे, मोहन विटकर आणि दोन ते तीन अनोळखी इसमांच्या विरोधात विशाल गायकवाड खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत विशालचा मोठा भाऊ अर्जुन नागू गायकवाड (वय ३२) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
परशुराम चौकात फिर्यादी अर्जुन यांचे वॉशिंग सेंटर आहे. अर्जुन आणि त्यांचा लहान भाऊ विशाल असे दोघेजण ते वॉशिंग सेंटर चालवतात. शुक्रवारी सायंकाळी लाईट नसल्याने वॉशिंग सेंटर मधील काम बंद होते. सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास अर्जुन हे वॉशिंग सेंटर समोर रस्त्याच्या पलीकडील बाजूला चहा पिण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी वॉशिंग सेंटरवर आले. आरोपींनी विशालवर कोयत्याने वार केले. वॉशिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगाराने धावत येऊन याबाबत अर्जुन यांना सांगितले. अर्जुन आणि कामगार वॉशिंग सेंटरकडे जात असताना एका आरोपीने पिस्तुलातून दोन ते तीन गोळ्या हवेत झाडल्या.
गोळीबार झाल्याने परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. काही वेळाने आरोपी निघून गेले. अर्जुन यांनी वॉशिंग सेंटरमध्ये धाव घेतली. त्यावेळी विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यावर, पाटीवर, पोटावर, पायावर, खांद्यावर कोयत्याने वार केले होते. जखमी विशालला खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा खून व्यावसायिक कारणावरून झाला असल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. मात्र हा खून पूर्ववैमनस्यातून केला असल्याचे म्हटले जात आहे.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी राजू मरिबा कांबळे, सिद्ध्या मरिबा कांबळे, मिलिंद मरीबा कांबळे, करण ससाणे, मोहन विटकर या आरोपींना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहे. दरम्यान आरोपीने मोहननगर पोलीस चौकीसमोर माथाडी कामगार संघटनेचे कार्यालय सुरु केले. त्या कार्यालयात त्याची येजा सुरु असते. हा आरोपी परिसरातील व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी गोळा करतो, असा स्थानिक व्यावसायिकांचा आरोप आहे. असे असताना देखील पोलिसांच्या नजरेस मात्र आरोपी पडत नाही. पोलिसांनी तोडपाणी करून डोळ्यावर पडदे ओढले असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांचा डोळेझाकपणा पुढील काळात गंभीर गुन्ह्यांना निमंत्रण देणारा ठरू शकतो.




