पुणे, 16 जानेवारी – “म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 5 हजार 915 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार म्हाडाच्या घरांसाठी 53 हजार जणांनी नोंदणी केली असून, दि.4 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे,’ अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.
म्हाडाच्या विविध योजनेतील 2 हजार 594 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2 हजार 990 सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 396 सदनिका असे एकूण 5 हजार 915 सदनिकांसाठी सोडत जारी केली आहे. दि. 5 जानेवारीपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यअंतर्गत 2 हजार 925 घरे उपलब्ध असून त्यासाठी सुमारे 800 नागरिकांनी अर्ज केले आहेत.
सोडतीचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची मुद्त – दि.4 फेब्रुवारी
सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास अंतिम मुदत – दि.5 फेब्रुवारी
ऑनलाईन पेमेंट, अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत – दि.6 फेब्रुवारी
सोडतीसाठी अंतिम अर्जांची यादी प्रसिद्ध – दि.15 फेब्रुवारी
सोडत – दि.17 फेब्रुवारी
यंदा म्हाडाने सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी नवीन संगणकीय प्रणाली आणली आहे. या प्रणालीनुसार नागरिकांना घरबसल्या संकेतस्थळावर किंवा मोबाइल ऍपच्या माध्यमातून नोंदणी, अर्ज भरणे, ऑनलाइन पेमेंट या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. किंवा गुगल प्ले स्टोअरमधून MHADA IHLMS 2.0 हे मोबाइल ऍपमधून नोंदणी करता येणार आहे.




