वडगाव मावळ : दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल जमा करणारे मावळ तालुक्यातील मुख्य असणारे वडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय अतिशय अडगळीच्या ठिकाणी असून त्याठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि विद्येचे माहेर घर असलेले पुणे अश्या दोन्ही मोठ्या शहरांच्या मध्यवर्थी ठिकाणी मावळ तालुका असल्याने तसेच निसर्ग सौदर्यामूळे पर्यटन क्षेत्राच्या होणाऱ्या विकासा बरोबरच औद्योगिक वसाहती देखील येथे वसल्याने येथील जमीनिना सोन्याचा भाव आला आहे. यामुळे अनेक उद्योजक, गुंतवणूकदार, कलाकार याठिकाणी जमीन घेण्यासाठी इच्छुक असतात यामुळे मावळात मोठ्या प्रमाणात जमीनिंच्या खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू असतात. आणि या माध्यमातून दरवर्षी कोटयावधीचा मसुल शासनास प्राप्त होत असतो.
कोट्यावधी रुपयांचा महसूल देणाऱ्या कार्यालयात मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. मावळात मोठ्या प्रमाणावर जमीन व सदनिकांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने वडगाव मावळ याठिकाणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. हे कार्यालय मुळातच अडगळीच्या ठिकाणी असल्याने याठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही, येथे आलेल्या नागरिकांना पुरेशी बैठक व्यवस्थाही उपलब्ध नाही. स्वच्छतागृह नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच वयोवृद्ध व दिव्याग नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची वेगळी व्यवस्थाही उपलब्ध नाही यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
वडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच इंटरनेट व सिस्टिम सर्वर डाउन असल्यामुळे नागरिकांना तासंतास दस्त नोंदणी करण्यासाठी थांबावे लागते. आणि त्यात याठिकाणी बसण्यासाठी देखील मुबलक जागा नसल्याने नागरिक या कार्यालया बाहेर उभी असलेली असतात यामध्ये याठिकाणी स्वच्छतागृह देखील उपलब्ध नसल्याने महिलांची मोठी अडचण होत आहे.
नागरिकांचे महत्वपूर्ण व मौल्यवान जमिनीचे दस्ताएवज या कार्यालयात असतानाही हे कार्यालय खाजगी जागेत मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात एवढे महत्वपूर्ण दस्त असताना देखील याठिकणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाही. मागील महिन्यातच या कार्यालयातून अनेक दस्त चोरीस गेल्याची घटना घडली असताना देखील प्रशासनाने अद्याप पर्यन्त कोणत्याही उपाय योजना केलेल्या नाहीत. यामुळे आणखी किती दस्त चोरीस गेल्यावर प्रशासनास जाग येणार आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गजानन भोईर (दुय्यम निबंधक, वडगाव मावळ ) : तुम्ही मुबलक जागा उपलब्ध करून द्या व तसा प्रस्ताव आम्हास दिल्यावर आम्ही त्या ठिकाणी कार्यालय स्थलांतरित करू.




