तळेगाव स्टेशन (वार्ताहर) : इंद्रायणी वरिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने शोभेच्या माशांचे मत्स्यपालन कसे करावे व त्याचे व्यवस्थापन या विषयावर एक आठवडयाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिबिर घेण्यात आले. इंद्रायणी वरिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान विभाग व जलदुत मत्स्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले.महाविद्यालयाचे विज्ञान विभागप्रमुख व प्राणीशास्त्र विषयाचे प्रा.रोहित नागलगाव व इंद्रायणी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच जलदुत मत्स्यालयचे संस्थापक व मत्स्य व्यवसायिक अतुल भालेकर यांनी मत्स्य व्यवसायमधील भविष्यातील संधी याबाबत विद्यार्थ्यांना संबोधले.शिशिर शेट्ये यांनी वास्तुशास्त्र आणि फिश ॲक्वेरिअम याचे महत्व यावेळी समजावून सांगितले.
या शिबिरात विद्यार्थ्याना विविध रंगीबेरंगी शोभेच्या माशांचे संगोपन,प्रजनन तसेच मासे पालणासाठी लागणारी विविध उपकरणे आणि काचेची टाकी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यानी शोभेचे मासे पाळण्यासाठी स्वतः काचेची टाकी तयार केली. या माध्यमातून शोभेच्या माशांच्या साहाय्याने उद्योजकता विकास करून भविष्यात या व्यवसायात असणाऱ्या संधींबाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. मत्स्यपालनाचे भविष्य आणि रोजगार संधी याबद्दल मार्गदर्शन केले.
या शिबिराच्या आयोजनासाठी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी पुढाकार घेऊन सर्वांना मार्गदर्शन केले. इंद्रायणी विदया मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.




