पिंपरी, दि. २२ जानेवारी – चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही असा सूचक इशारा अजित पवारांनी दिला आहे. याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.२१) प्रत्यक्ष भेटून कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. माणुसकीच्या भावनेतून पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भावना आमदार अण्णा बनसोडे यांनी जरी व्यक्त केली असली तरी पंढरपूर येथील आमदार भारत भालके यांचे निधनानतर माणुसकी कुठे गेली होती, असा रोखठोक सवाल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रसिध्दीपत्रकातून उपस्थित केला आहे.
नाना काटे पत्रकात म्हटले आहे की, भाजपला इतर पक्ष संपवायचे आहेत. त्यांना विरोध कऱणाऱ्यांना ते ईडी, सीबीआयचा धाक दाखवून गप्प करतात. राज्यात चार आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणुका झाल्या. यात पंढरपूर-देगलूर, कोल्हापूर व अंधेरी (मुंबई) या सर्व ठिकाणी भाजपने सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार होते. राज्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि नेते हे त्यांच्यासाठी दुष्मन आहेत. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदारांचे निधन झाले त्यावेळी त्यांनी माणुसकी दाखवली नाही. भाजप हा अत्यंत संकुचित, जातीयवादी, मतलबी, स्वार्थी मनाचा पक्ष आहे. वैचारिकदृष्ट्या भाजपची विचारधारा आम्हा पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांना बिलकूल मान्य नाही. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीसाठी बिनविरोध विसरा, आता पंढरपूरचा बदला घेण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
आमदार बनसोडे यांनी पवारसाहेबांनी दिलेल्या संस्कारामुळेच ते तसे बोलले. आम्हीसुध्दा त्यांचा आदर करतो, पण पंढरपूर, कोल्हापूरला वेगळा न्याय आणि चिंचवडला वेगळा न्याय होणार नाही. निश्चितच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याबद्दल आम्हालाही प्रचंड सहानुभूती आहे. त्यांचे राष्ट्रवादीसाठीचे योगदान आम्ही कदापि विसरणार नाही. मात्र, २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करून महापालिकेतील सत्ता भाजपने खेचून घेतली. तो पराभव विसरता येणार नाही. चिंचवडची पोटनिवडणूक ही आता राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाची लढाई आहे. महापालिकेत भ्रष्टाचाराचे थैमान घालणाऱ्या भाजपला चिंचवडची जनता मोकाट सोडणार नाही. महापालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा जो आदेश देईल त्यानुसार आम्ही काम करू. आता फक्त लढायचे आणि जिंकायचे हेच ध्येय आमच्यापुढे आहे, असे नाना काटे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.




