पिंपरी : महाराष्ट्रात नुकताच पार पडलेल्या पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपला फक्त एकाच जागेवर यश मिळालं आहे. उरलेल्या तीन जागा महाविकासआघाडीला आणि एक जागा काँग्रेसच्या अपक्षाला मिळाली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा हा निकाल भाजप तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी धक्का देणारा आहे. तर महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरणारा आहे. याचा थेट परिणाम पुणे आणि चिंचवड पोटनिवडणुकीत पडणारा आहे. पदवीधर निवडणुकीच्या निकालामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळणारे आहे. या निकालामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे आणि दोन्ही मतदारसंघात टिळक व जगताप यांचे उत्तराधिकारी कोण यातून मिळणारी सहानुभूतीही काळाच्या पडद्याआड गेल्याचे चित्र दिसत आहेत.
भाजपचे कसबा व चिंचवड विधानसभेतील दोन्हीही आमदारांच्या निधनामुळे पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांच्याकडून दोन्हीही पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी महाविकास आघाडीचे महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली आहे. दोन दिवसात महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप मधील उमेदवारीवरून मोठे रणकंदन सुरू आहे.
चिंचवड विधानसभेतील सहानुभूती संपली?
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधनानंतर केवळ पंधरा दिवसांमध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. जगताप यांच्या निधनाच्या दुःखातून कुटुंब सावरण्यापूर्वीच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जगताप कुटुंबीयांमधील कोणाला उमेदवारी द्यावी यावरून समर्थकांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांच्या समर्थकांना सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केली आहे. समर्थकांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर समर्थन दर्शवलं आहे. त्यात वेगवेगळ्या टॅगलाईन वापरल्या आहेत. अश्विनी जगताप यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या इमेजमध्ये “आदेश पक्षाचा, निर्धार जनतेचा” असा आशय लिहिण्यात आला आहे. तर शंकर जगताप समर्थकांकडून पोस्ट इमेजवर, “एक ही कार्यकर्ता ‘लक्ष्मण’ रेषा ओलांडणार नाही, आमदार शंकरशेठ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमदार जगतापच.” असा आशय लिहिण्यात आला आहे. त्यामुळे कुटुंबातच उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू असल्याने जगताप यांच्या निधनाची सहानुभूती हा विषय बाजूला फेकला असल्याचे दिसून येत आहे.
तर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे पुत्र आदित्य जगतापने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट टाकली आहे. जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत, असा आशय आणि सोबत कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटोही अपलोड केलेले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी आणि भाऊ शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरून वाद असल्याचे समोर आले होते. लक्ष्मण जगतापांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला नसताना कुटुंबातील वादाची चर्चा समोर आली आहे. त्याचअनुषंगाने आदित्यच्या भावनिक पोस्टनंतर या वादावर पडदा पडेल का? याकडे लक्ष लागले आहे.
पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट भाजपला धक्का देणारी ठरू शकते…..
राज्यात नुकत्याच झालेल्या उच्च शिक्षित पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राज्यातील सत्तेत असणाऱ्या शिंदे व फडणवीस सरकारला मोठी मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे दोन दिग्गज नेते गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातच भाजपला मिळालेला पराभवाचा धक्का महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडल्याची चर्चा घडवून आणणारा विषय बनला आहे. भाजप व आरएसएसचे मुख्यालय असणाऱ्या नागपूर होमग्राऊंड वरती काँग्रेसने विधानपरिषदेची जागा खेचून आणली आहे. याचा थेट परिणाम पुणे व चिंचवड येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरती होणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीने एक उमेदवार उभा केल्यास ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. महाविकास आघाडीची एकजूट ही भाजपला डोकेदुखी ठरणारी आहे याचा थेट परिणाम पोटनिवडणुकीत पुन्हा होईल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.




