पिंपरी : पोट निवडणूकसाठी विधानसभेच्या दोन जागा होत्या त्यापैकी कसबा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला दिली. तर आज आम्ही सर्वांनी नाना काटे यांचा अर्ज दाखल केलेला आहे. उद्या अर्ज छाणणी आहे, त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. काल रात्री उशीरापर्यंत आम्ही या ठिकाणी उमेदवारीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. परंतु दुर्दैवाने यावर एकमत झालं नाही.
आज सकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. माझं बाळासाहेब थोरातांशीही बोलणं झालं आणि त्यांना आज आम्ही नाना काटे यांचा अर्ज दाखल करत असल्याचे मी सांगितले. आमच्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांनी शांत रहावं म्हणून आम्ही प्रयत्न सुरू ठेवणार आहोत, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो.
याचबरोबर, “पंढरपूरची निवडणूकही लढली गेली, कोल्हापूरची निवडणूकही लढली गेली. देगलूरची निवडणूकही लढली गेली. फक्त अपवाद आहे तो मुंबईचा आणि मुंबईची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये मात्र आवाहन केल्यानंतर प्रमुख पक्षांनी तिथं उमेदवारी दिली नाही. आम्ही आणि शिवसेना, काँग्रेस सर्वांशी चर्चा करत होतो, त्यावेळी असं सर्वांचं मत आलं की ही निवडणूक लढवावी, त्यामुळे आम्ही अर्ज दाखल केलेला आहे.” असंही अजित पवार म्हणाले.
याशिवाय, राहुल कलाटेंना सांगण्याचं आम्ही काम करू, ऐकायचं नाही ऐकायचं हा त्याचा निर्णय आहे. मला मात्र उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितल आहे की, आपला महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे यांना शिवसेनेचा स्पष्ट पाठिंबा राहील. एक नक्कीच सांगेन हलक्यात घेतली तर निवडणूक सोपी नाही. परंतु कष्ट घेतले तर निवडणूक अवघडही नाही. या शहराचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच पिंपरी-चिंचवडमधून झाली आहे.




