पिंपरी, १६ फेब्रुवारी :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी भाजपला जेरीस आणल्याचे चित्र आहे. अशा वेळी 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट नाकरल्यानंतर ओव्हाळ यांनी आपल्या भावजय यांना भाजपकडून पुरस्कृत उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली. मात्र, त्यात विद्यमान नगरसेवक असतानाही शेखर ओव्हाळ यांना मोठे अपयश आले. नंतर 2021 मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी केली होती. आता पोट निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा भाजपचा झेंडा हातात घेतला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेखर ओव्हाळ यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आदी उपस्थित होते.
शेखर ओव्हाळ हे २०१२ ते २०१७ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. तसेच ते २०१९ मध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघातूनही इच्छुक होते. त्यावेळी पक्षाने आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर विश्वास दाखवत तिकीट दिल्यानंतर त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे अशी भावना तयार झाली. त्यामुळे त्यांनी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
2012 साली झालेल्या निवडणुकीत नवखा चेहरा असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेखर ओव्हाळ थेट महानगरपालिकेत पोहोचले. पाच वर्षात शेखर ओव्हाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ड प्रभाग अध्यक्ष पद दिले होते. त्यानंतर 2017 पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांच्या कुटुंबात तिकीट न दिल्याने त्यांच्या भावजई यांना भाजपकडून पुरस्कृत उमेदवारी घेतली .मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. 2019 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वगृही परतले. आता 2023 मध्ये पुन्हा ते भाजपमध्ये गेले.




