चिखली : जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ कंपनी, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. तसेच जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ अंतर्गत सुरू झालेले स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज हे महाराष्ट्र स्वयं अर्थसंहाय्यित शाळा (स्थापना व विनिमय) नियम २०१२ अंतर्गत स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर चालविण्यात येत आहे.
सदर शाळेस शैक्षणिक वर्ष २०२३ -२०२४ साठी प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निर्धारित केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा दुपटीने अर्ज आल्याने ही प्रक्रिया व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार सोडत पद्धतीने अतिशय पारदर्शी वातावरणात पार पडली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज, पाटीलनगर टाळगाव चिखली येथे बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी प्रवेशाची सोडत पालकांच्या संमतीने व मान्यवरांसह पालकांच्या हस्ते पार पाडण्यात आली. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील माजी स्वीकृत नगरसेवक संतोष मोरे, दिनेश यादव, संतपीठाचे संचालक राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती मुळे, संतपीठ प्राचार्या डॉ. मृदुला महाजन, आदी मान्यवर, संतपीठ कर्मचारी वृंद यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विद्यार्थी सोडत पद्धत सुरू करण्यात आली.
यंदा पूर्व प्रथमिक व प्राथमिक वर्गाच्या नर्सरीपासून ते इयत्ता सातवी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे संतपीठाच्या संचालकांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी आलेल्या एकूण १३६६ प्रवेश अर्जांपैकी जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठाची प्रवेश संख्या सोडत पद्धतीने पाडण्यात येवून एकूण ६८७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.




