पुणे: भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सध्या कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. भाजपाचा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याठिकाणी बदलाचे वारे वाहत आहे.
त्यातच आता भाजपाने पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवलं आहे. त्यांची प्रकृती ठीक नसताना ते प्रचाराला उपस्थित राहिले आहेत. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले. यावेळी पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन भाजपा नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. पण नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशा अवस्थेतही ते भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे.ते मागील अनेक दिवसांपासून ते एका मोठ्या आजाराशी लढा देत आहेत.
यापूर्वीही भाजप पक्षाकडून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांना मतदानासाठी मुंबई येथे रुग्णवाहिकेतून नेण्यात आले होते. या संपूर्ण प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. प्रचंड आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपा त्यांच्या जीवनाशी खेळ करत आहे, अशी टीका जगताप यांनी केली. तसेच गेल्या पाच वर्षात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत गिरीश बापट यांचा समावेश करण्यात आला नाही, पण आता कसबा निवडणुकीच्या वेळी बापटांची भाजपाच्या नेतृत्वाला आठवण आली, अशी टीका जगताप यांनी केली.




