पिंपरी : कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपला कडवी झुंज दिली. यात कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना धूळ चारत विजय मिळवला तर चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप यांनी बालेकिल्ला राखत ३६ हजार मताधिक्याने विजय संपादन केला. यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी घेतलेली ४० हजार मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोक्याची ठरली.
मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला पण, चिंचवडची जागा राखण्यात भाजपला यश आले आहे. यामध्ये अश्विनी जगताप यांना 135494 एवढी मते मिळाली असून नाना काटे यांना 99424 एवढी मते मिळाली. तर, यामध्ये चर्चेत असणारे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनाही 40075 इतकी मते मिळून पराभव पत्कारवा लागला.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहराचे मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. परंतु, आता अश्विनी जगताप यांच्या विजयाने पुन्हा एकदा नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. “मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनी विजयानंतर दिली आहे.




