पिंपरी : दिवगंत आमदार लक्ष्मण जगतापांच्यामागे भाजपला अगदी जगताप कुटुंबियांनाही चिंचवड पुन्हा जिंकताना नाकीनऊ येणार असल्याचे हेरून चिंचवडच्या मिशनसाठी भाजपने मुख्यमंत्र्याच्या एका खास सहकाऱ्याला कामाला लावण्यात आले होते. अजित पवार यांची खेळी उधळवून लावण्यात फडणवीस यांना मोलाची मदत करणारा मुख्यमंत्री शिंदे यांचा खास सहकारी कोण याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपचे उमेदवार अश्विनीताई जगताप यांचा मार्ग सुकर करण्यासाठी राहुल कलाटे स्पर्धेत राहणे काळाची गरज बनली होती. त्यामुळे राहुल कलाटेंचे मन वळविण्यासाठी फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या एक (पांढरी दाढीतील) विश्वासू सहकाऱ्याचा उदय होत त्याच्याकडे ही जबाबदारी सोपविली. निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी कलाटेंना या सहकाऱ्याने तयार केले आणि विश्वास व आर्थिक रसद पुरवली. या सहकाऱ्याच्या कलाटेंशी असलेल्या मैत्रीचा फायदा यावेळी झाला. त्यानंतर कलाटे लढण्यावर ठाम झाले. कलाटेंना पडद्याआडून मोठी ताकद देऊन एकनाथ शिंदेंच्या या सहकाऱ्याने चिंचवडच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीची व्यूहरचना लक्षात घेऊन चिंचवडमध्ये भाजप उमेदवारास धोका होऊ नये, याकरिता भाजप-शिवसेनेनेही (शिंदे गट) एकत्रित डावपेच आखून, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल कलाटेंच्या ताकदीचा पुरेपूर फायदा करून घेण्याची चाल सत्ताधाऱ्यांनी केली. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्याला एक लाखापेक्षा अधिक मते घेतल्याचे आकडे मांडून पोटनिवडणूक लढविण्यावर कलाटे ठाम ठेवले. चिंचवडची जागा भाजपकडून खेचून आणण्यासाठी अजित पवार यांनी प्रचंड ताकद लावली होती. राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्यासाठी अजितदादांनी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला होता.
मात्र, अजित पवारांच्या मनसुभ्यांना सुरुंग लावण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी केले. निवडणूक लढण्यापासून मतदारापर्यंत आर्थिक रसद पुरवण्यासाठी मंत्रिमंडळातील एक नेता मतदानाच्या शेवटच्या वेळेपर्यंत कार्यरत होता. मतदानादिवशी मतदार बाहेर पडत नाही हे लक्षात आल्यानंतर मुंबईतून लक्ष्मीची पावले भर दुपारी मतदारसंघाच्या किवळे भागात प्रकटली. अगदी याला चोख बंदोबस्तात अपक्ष उमेदवारापर्यंत पोहोचवण्यात आले. दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 30 असताना पुढील दोन तासात चमत्कार घडत मतदानाची टक्केवारी थेट 50 टक्के पर्यंत पोहोचली. आणि याचमुळे महाविकास आघाडीचे उमेदवारांचे मताधिक्य मतमोजणी वेळी हळूहळू वाढण्याऐवजी समांतर होत गेले. अगदी पिंपळे सौदागरपर्यंत महाविकास आघाडीचे मतदान भाजपच्या उमेदवारापेक्षा अधिक होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. आणि याचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसत पराभवाला सामोरे जावे लागले.




