- मार्च महिन्यातील संपूर्ण थकबाकी वसुलीचे लक्ष – सरनाईक
तळेगाव दाभाडे : ३१ मार्च २०२३ अखेर १००% कर वसुलीचे लक्ष ठेव तळेगाव दाभाडे नगर परिषदेने मोठ्या थकबाकीदारांसह दहा हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या मिळकत धारकांना वेळोवेळी जप्ती वॉरंट बजावून मिळकत कर भरण्यासाठी आवाहन केले होते. याचेच फलित म्हणून फेब्रुवारी अखेर नगरपरिषदेने २ कोटी ४० लाख रुपयांची थकीत रक्कम वसूल केली आहे. पुढील काळामध्ये थकीत रक्कम वसूल करण्यासाठी नगरपरिषद पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन खंडित करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.
मिळकत कर वसुली व नळ कनेक्शन तोडण्यासाठी एकूण सहा पथके नेमण्यात आली आहे. यामध्ये विविध विभागांचे विभाग प्रमुख, संबंधित वॉर्डचे कर लीपिक व नळ कनेक्शन तोडणारे कर्मचारी यांचा समावेश या पथकामध्ये करण्यात आला आहे. दैनंदिन वसुलीसाठी व थकबाकीदारांवर कार्यवाहीसाठी हे पथक शहरातून फिरणार असल्याचे थकीत तसेच चालू वर्षाची मिळकत कर पट्टी व पाणीपट्टी त्वरित भरणा करावी असे आवाहन मुख्याधिकारी सरनाईक यांनी केले आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीने व शनिवार रविवारी देखील भरणा केंद्रावर पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




