पिंपरी : 2014 ची विधानसभेत एकही राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला नाही. त्यानंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. 2019 च्या निवडणुकीत पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार निवडून आला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारचा उदय झाला. नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपने जिंकली असली तरी, मात्र भाजपला ही निवडणूक अवघड गेली, ही खरी वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाला पहिल्यांदाच लाखभर मतांचा टप्पा गाठता आला. यामुळे आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका भाजपसाठी सोपे राहिलेले नाही, हेच पोटनिवडणुकीच्या मतांच्या आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला आहे. २००९ पासून आतापर्यंत एकूण चार वेळा येथे विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. राज्यातील मतदारसंख्येच्या दृष्टीने चिंचवड हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या एकट्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या तब्बल १३ प्रभागांचा समावेश होतो. एका प्रभागातून चार नगरसेवक असे, तब्बल ५२ नगरसेवक एकट्या चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडून जातात. मागील महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने चिंचवड विधानसभा मतदारसंघात करिष्मा दाखवला होता. एकट्या भाजप पक्षाचे चिंचवडमधून ३३ नगरसेवक निवडून आले होते.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा चिंचवड विधानसभेवर शेवटच्या क्षणापर्यंत कायम दबदबा राहिला. मतदार संघाच्या पुनर्रचनेपासून जगतापांचे या मतदारसंघात वर्चस्व कायम होते. लक्ष्मणभाऊ यांच्या निधनानतर त्यांच्या पत्नी पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांचा विजय झाला असला तरी, जगताप यांचे मताधिक्य घटलेले दिसून आले. तब्बल १५ हजारांचे आसपास भाजपची मते कमी झाले. तर विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अपक्ष उमेदवार यांच्या मतांची गोळा बेरीज भाजप पेक्षा अधिक झालेली आहे. संपूर्ण मतदारसंघाचा विचार करता, ज्या पद्धतीने भाजपला मताधिक्याची अपेक्षा होती, त्याला धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
अगदी मतदानाची टक्केवारी तपासली असता किवळे पासून पिंपळे सौदागर पर्यंत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत मताधिक्य कमी मिळालेले दिसून आले. विधानसभेतील 70 टक्के हुन अधिकच्या भागात भाजपचे मताधिक्य विरोधकांच्या तुलनेत खूपच कमी जाणवले. केवळ जगताप यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी या परिसरात नागरिकांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मरणोत्तर जगताप कुटुंबीयांना भरभरून मतदान दिले. चिंचवड विधानसभेत असणाऱ्या एकूण साडेपाच लाख मतदारांपैकी एक लाख 35 हजार मतदारांनी मतदान भाजपला मतदान केले आहे. त्यामुळे एकूण चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विचार करता आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला महापालिकेचे निवडणूक सोपी जाणार नसल्याचे यातून दिसून येते.




