रावेत : पिंपरी चिंचवड महापालिकेची लिटमल टेस्ट म्हणून पाहिले जाणारे चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सत्ताधारी भाजपला महाविकास आघाडीसोबत चुरशीचा सामना करावा लागला. केवळ स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची सहानुभूती आणि “जगताप पॅटर्न”मुळेच चिंचवडमध्ये भाजपला यश मिळाले. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील फुटीचा थेट फायदा भाजपला झाला आहे. महापालिकेचे निवडणूक कधीही लागू शकते त्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळवण्यासाठी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे हे या निकालातून समोर आले आहे.
वास्तविक, महाविकास आघाडीतील काही माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे ताकद लावली. त्यामुळे अनेक प्रभागात भाजपला किंचितसे मताधिक्य मिळाले तर भाजपचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या अनेक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी लक्षवेधी मतदान घेतले याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळालेले मतदान महाविकास आघाडी सोबत आले असते तर निकाल वेगळा दिसला असता. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालातून स्थानिक महाविकास आघाडीतील एकजूट महापालिकेसाठी भाजपला धोक्याची घंटा मानली जात आहे.
राज्यात सत्तेवर असणारे भाजप महानगरपालिकेत मूळच्या चार प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. तर २०१७ मधील प्रभाग क्रमांक – 16 हा वाल्हेकरवाडी, शिंदेवस्ती, रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर या भागात समाविष्ट आहे. या भागात भाजपचे नगरसेवक संगीता भोंडवे व बाळासाहेब ओव्हाळ प्रतिनिधित्व करतात तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोरेश्वर भोंडवे व प्रज्ञा खानोलकर प्रतिनिधित्व करतात प्रभागाचे एकूण मतदान एकूण ५२ हजार ८७८ मतदान आहे. यामधील पोट निवडणुकीत २६,०३७ लोकांनी मतदान केले. एकूण ४८.३०% मतदान झाले.
विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाची आकडेवारी पाहता भाजपच्या उमेदवार अश्विनीताई जगताप यांना ११,६३७ मतदान मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना ९,६१४ तर अपक्ष राहुल कलाटे यांना ३६९४ मतदान मिळाले. सोबत इतर अपक्षांना ८०३ व नोटा यांना २८९ मतदान झाले.
यामध्ये भाजपला मिळालेल्या मतापेक्षा महाविकास आघाडी मधील विभागलेल्या मतांची बेरीज १६७१ मतांनी अधिक आहे. या निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादी कांग्रेसकडून लढलेले नवनाथ लोखंडे व माजी नगरसेवक गणेश भोंडवे यांनीही भाजपला मदत केली आहे. पक्ष विरहीत १०९२ भाजप विरोधात मतदान आहे. ही सर्व एकूण २७६३ मतदान हे सत्ताधारी भाजप विरोधी आहे. त्यामुळे हे मतदान कोणाकडे जाणार आणि महापालिका निवडणुकात महाविकास आघाडी एकत्र येणार का? यावरती महापालिकेतील राजकीय गणिते ठरणार आहेत. त्यामुळे महापालिकेची लिटिल टेस्ट असणाऱ्या पोटनिवडणुकीतून महाविकास आघाडीसाठी फायद्याची तर भाजपसाठी डोकेदुखी वाढणारी आहे हेच दिसून येते.




