पिंपरी : देहू आळंदी या दोन्हीही तीर्थक्षेत्रांना जोडणारा पिंपरी चिंचवड हद्दीतील देहू आळंदी बीआरटी रोड पाण्याच्या पाईपलाईनमुळे मागील एक वर्षापासून उघडलेला आहे. ९ मार्च २०२३ रोजी देहू येथे श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न होत असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक आणि दिंड्या देहू आळंदी रस्त्यावरून ये-जा करणार आहेत. अशावेळी महापालिकेच्या वतीने या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासाठी माजी नगरसेवक व राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष यश साने, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पिंजन, गणेश भालेकर, सुमित भालेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे महापालिकेकडे तळवडे चिखली परिसरात दुरावस्था झालेल्या देहू आळंदी बीआरटीएस रोडची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. ९ मार्च रोजी हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून साजरा केला जात आहे. या सोहळ्याला साधारणतः आठवडाभर वारकऱ्यांची ये-जा असणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू व आळंदी येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी संप्रदायाचे भाविक येत असतात. आळंदी येथे आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त आल्यानंतर अनेक भाविक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेऊनच परत जात असतात. त्यामुळे देहू आळंदी रस्त्यावर सतत वर्दळ असते.
तथापि, देहू आळंदी रस्त्याची सद्यस्थितीत अत्यंत दुरावस्था झालेली आहे. सदरचा रस्ता एमएनजीएलची गॅस लाईन टाकण्यासाठी तसेच पाणीपुरवठ्याचे पाईप लाईन काम केल्यामुळे खराब झालेला आहे. संपूर्ण रस्ता उघडला असून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यास येणाऱ्या बहुतांश भाविकांची अनवाणी पायी प्रवास करतात. अशावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भावनिकेचा विचार करून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालय व सह शहर अभियंता, बीआरटी प्रकल्प यांच्याकडे केली आहे.




