तळेगाव दाभाडे : जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असलेला सोमाटणे गावच्या हद्दीतील टोल नाका हा अनाधिकृत असून यावर होणारी टोल वसुली ही बेकायदेशीर असल्याचा आरोप करत टोल हटाव कृती समितीच्या वतीने मागील आठवड्यामध्ये बेमुदत उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलकांना भेट देत पुढील निर्णय होईपर्यंत या टोल नाक्यावर सर्व चार चाकी गाड्यांकडून कुठल्याही प्रकारचा टोल घेतला जाणार नाही असे आश्वासन दिले होते. टोल नाक्यावर होत असलेल्या वसुलीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आयआरबी प्रशासनाने जनतेला संभ्रम अवस्थेत टाकले आहे.
राज्यभरातील चार चाकी वाहनांना टोल मधून सूट देण्यात आली असल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची टोल नाक्यावर फसवणूक होऊ नये यासाठी कृती समितीच्या वतीने टोल नाक्यावर खडा पहारा देण्यात येत होता. आंदोलन ठिकाणी कृती समितीचे किशोर आवारे, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री संजय भेगडे, यांनी रविवारी (ता. १९) सोमाटणे टोलनाक्यावर जाऊन टोल नाक्यावर लागणाऱ्या लांब रांगा, यामुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच सर्वसामान्य नागरिकांची होणारी टोल वसुली याविषयी जाब विचारला. त्यानंतर आयआरबीने कृती समितीला फास्टॅगच्या माध्यमातून मावळ विभागातील कारचे पथकर कपात होत असल्याची कबुलीपत्र लिहून देत, परतावा देण्याचे मान्य केले. या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेण्यावेळी मंत्र्यांनी दिलेली तोंडी आश्वासने पाळली न गेल्याने कृती समिती आणि वाहनचालकांमध्ये सरकारने तोंडाला पाने पुसल्याची भावना आहे.
- फास्टॅगमधून गेलेले पैसे परत मिळणार
आंदोलनानंतरही स्थानिकांच्या कारच्या फास्टॅगमधून टोल कपात झाल्यास आरसी बुक व आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करून, खातरजमा केल्यानंतर संबंधित वाहनधारकांच्या बँक खात्यावर फास्टॅगवरून वजावट झालेले पैसे जमा करण्यात येतील, असे आयआरबी एमपी एक्स्प्रेस वे यांनी लेखी पत्र काढत अश्वस्थ केले आहे, परंतु हे पैसे कधी मिळतील हाच खरा प्रश्न आहे.




