तळेगाव दाभाडे: येथील जागृत ग्रामदैवत असलेले श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने भाविकांच्या महापुरात अलोट गर्दीत तळेगाव दाभाडे नगरी गजबजून गेली होती. यावेळी अनेक सांस्कृतिक धार्मिक व पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचे अभिषेक व पूजा पहाटे उत्सव समितीचे अध्यक्ष प्रणव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर संध्याकाळी नाथांच्या छबीना पालखीची ग्राम प्रदक्षिणेला मोठी गर्दी होती. यावेळी घोडे उंट यांच्यासह ढोलताशा पथक, बॅन्जो सह दिमाखात पालखीनी नगर प्रदक्षिणा पुर्ण केली.
बुधवारी घोरवाडी स्टेशन जवळ बदला माझ्या सौभाग्याचा या वगनाट्यवर तमाशाचे आयोजन करण्यात आले होते, तर मावळातील ओझर्डे येथील श्री गुरुदेव दत्त प्रासादिक नाट्यरूपी रंगीत संगीत भजनी भारुड मंडळ यांचे पाप पुण्याचा ठेवा अर्थात पुत्राचे बलिदान यावर भारुडाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी बारा गावच्या बारा अप्सरा हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी मदमस्त अप्सरा हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये उद्योजक विलास काळोखे यांची बैल जोड फळी फोडची मानकरी ठरली. लाखो रुपयांचे बक्षीस असणाऱ्या या बैलगाडा शर्यतीत बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. पारंपारिक निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान महाराष्ट्रातून आलेल्या मल्लांनी गाजवले. यावेळी प्रथम क्रमांक येणाऱ्या मलाला चांदीची गदा देण्यात आली.
उत्सवानिमित्त अनेक छोट्यामोठ्या दुकानदारांनी दुकाने लावली होती. यावेळी पाळणे, गोडे सफारी आदी ठिकाणी बाल चमूने आनंद लुटला. उत्सवाचे नियोजन श्री डोळसनाथ महाराज नवनिर्माण समितीच्या मार्गदर्शनाखाली श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले.




