पवनानगर: मावळ तालुक्यातील साते गावात गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे मेघडंबरीत विराजित असलेल्या मूर्तीचे स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. शिवस्मारक समिती साते, मावळ तालुका शिवभक्त, ग्रुप ग्रामपंचायत साते आणि ग्रामस्थांच्या संकल्पनेतून हे भव्य दिव्य आणि सुंदर असे शिवस्मारक उभे राहिले आहे.
मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके हे देखील काल (बुधवार, दिनांक 22 मार्च) रोजी साते येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. छत्रपतींच्या आदर्शाची, विचारांची, तत्त्वांची कास धरण्याची आजच्या काळाची गरज आहे. छत्रपती शिवरायांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या व्यापक आणि सर्वसमावेशक तत्वांची जोपासना सर्वांनीच करायला हवी, असे मनोगत आमदार शेळकेंनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके यांसह, माजी सभापती बाबुराव वायकर, पंचक्रोशीतील युवा शिवभक्त, गावचे आजी-माजी सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




