लोणावळा: महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला कार्ल्यात सुरुवात झाली आहे. षष्टीच्या दिवशी आई एकविरा देवीचे माहेरघर असलेल्या देवघरात देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मुंबई, रायगड, कोकण, तळकोकण भागातून आलेल्या आई एकविरा देवीच्या पालख्या याठिकाणी भाऊ काळभैरवनाथाची भेट घेण्यासाठी आल्या होत्या.
रात्री पावणे आठ वाजता भैरवनाथ महाराजांची आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. कोळी, आग्री समाजातील अनेक भाविक आणि पालख्या देवघरात दाखल झाल्याने देवघरचा परिसर गजबजला होता. पालखी सोहळ्यानंतर भाविकांनी एकविरा देवी मंदिराकडे कूच केली.




