पिंपरी : पानाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टपरी चालकाला मारहाण करून रोकड लुटली. ‘मी दापोडीचा भाई आहे. यापुढे प्रत्येक महिन्याला मला गुपचूप हप्ता द्यायचा, नाही दिला तर मी तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना दापोडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घडली.
कुणाल बाळासाहेब पवार (रा. मारुती मंदिर चौक, दापोडी गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमेध ऊर्फ गोट्या गायकवाड, बॉक्सी पठारे (दोघेही रा. सिद्धार्थनगर, दापोडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. न फिर्यादी यांची दापोडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पानटपरी असून, तेथे आलेल्या आरोपींनी त्यांच्याकडे खाण्याचे पान मागितले. त्यानंतर फिर्यादी यांनी पानाचे पैसे मागितले असता, सुमेध याने ‘तू मला ओळखत नाहीस का? मी दापोडीचा भाई आहे, आणि तू माझ्याकडे पैसे मागतोस?’, असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली.
त्यांच्या शर्टची कॉलर पकडून टपरीच्या बाहेर ओढत हाताने मारहाण केली. त्यास फिर्यादीने विरोध केला असता, आरोपी सुमेध याने फिर्यादीला मारहाण करीत खिशातील तसेच पानटपरीच्या गल्ल्यातील अशी एकूण सात हजारांची रोकड लुटली.




