पिंपरी : शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या खून प्रकरणी शिरगाव पोलिसांनी आज ४ एप्रिल रोजी पहाटे आणखी तिघांना अटक केली. यामुळे अटकेतील आरोपींची संख्या सातवर गेली आहे.
विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय २५), संदीप उर्फ आण्णा छगन गोपाळे (वय ३१), ऋतिक शिवाजी गोपाळे (वय २२, तिघे रा. शिरगाव, ता. मावळ) अशी या तिघांची नावे आहेत. यापूर्वी महेश भेगडे (वय ४१, रा. तळेगाव दाभाडे), अशोक लक्ष्मण कांबळे ( वय ५३ रा. कांब्रे नामा, ता. मावळ), मनेश देवराम ओव्हाळ (वय ४२ रा. जांभूळ, ता. मावळ), अमोल आप्पासाहेब गोपाळे (वय ३८, रा. डॅफोडील सोसायटी, सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांना अटक करण्यात आली आहे.
प्रवीण गोपाळे यांचा १ एप्रिल रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास दुचाकीवर (एमएच 14/ एफझेड 7080) प्रति शिर्डी साई मंदिराच्या समोर रस्त्याच्या बाजूला बसले असता मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. प्रवीण गोपाळे यांचे बंधू रवींद्र गोपाळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत त्यांनी काही स्थानिक व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता.
त्यानुसार पोलिसांनी २ मार्च रोजी चौघांना अटक केली. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ एप्रिलपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर ४ एप्रिल रोजी अटक केलेल्या तिघांना १० एप्रिलपर्यंत न्यायलयाने पोलीसकोठडी दिली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ अधिक तपास करीत आहेत.




