मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर (Maval) झाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार (दि. 3) पर्यंत होती. समितीच्या 18 जागांसाठी 147 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिल रोजी होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तळेगाव दाभाडे येथील शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात अर्ज दाखल करण्याची सुविधा होती. सोमवारी शेवटचा दिवस असल्याने अनेक उमेदवारांनी मोठी गर्दी केली.
पक्षादेशाची वाट न पाहता अनेकांनी अर्ज भरण्यावर जोर दिला.राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, आरपीआय यासह सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी कृषी पतसंस्था मतदार संघ 11, ग्रामपंचायत मतदार संघ 4, व्यापारी व आडते मतदार संघ दोन, हमाल व तोलारी मतदार संघ एक अशा एकूण 18 जागा आहेत.
कृषी पतसंस्थेच्या 11 जागांसाठी 90, ग्रामपंचायत मतदार संघाच्या चार जागांसाठी 47, व्यापारी व आडते मतदारसंघाच्या दोन जागांसाठी आठ तर हमाल व तोलारी मतदार संघाच्या एका जागेसाठी दोन अशा एकूण 147 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी (दि. 5) दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे.
मागील 12 वर्षांपासून मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झालेली नाही. 12 वर्षानंतर प्रथमच निवडणूक होत आहे. निवडणूक अधिकारी म्हणून शिवाजीराव घुले हे काम पाहत आहेत.




