पवना सहकारी बँकेचा कारभार बँकेचे संस्थापक आणि जेष्ठ नेते माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, स्वच्छ आहे. पण, सातत्याने त्याच-त्याच लोकांना प्रतिनिधीत्व दिले जाते. एका आडनावाचे दोन उमेदवार आणि घराणेशाहिविरोधात आम्ही निवडणूक लढवत असल्याचे सांगत पवना प्रगती पॅनेलने आपली भूमिका आज (बुधवारी) स्पष्ट केली.
चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला उमेदवार विलास भोईर, अमर कापसे, दत्तात्रय दातीर, दिलीप नाणेकर यांच्यासह संजय कलापुरे, रमेश वाघेरे उपस्थित होते. विलास भोईर म्हणाले, बँकेचे संस्थापक ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने पवना बँक स्थापन झाली. लांडगे यांचे सहकार क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. ते आमचे दैवतच आहेत. परंतु आमचा खरा विरोध हा लांडगे साहेबांना वेठिस धरून स्वतःचा स्वार्थ व हित जपणाऱ्या आणि त्यांच्या भोवतालच्या इतर संचालकांना आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमचीही भूमिका होती. आमच्या सातपैकी दोन लोकांना संधी देण्याची विनंती केली होती. पण, परस्पर पॅनेल जाहीर केला. माघारीसाठी आमच्यावर दबाव आणला गेला. मात्र, ज्ञानेश्वर लांडगे यांनी आम्हाला माघारीसाठी कधीच फोन केला नाही, असेही त्यांनी सांगितले.



