लोणावळा : डंपर आणि दुचाकी यांच्यादरम्यान झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्याच्या मागे बसलेली युवती ही गंभीररीत्या जखमी झाली आहे. वरसोली (ता. मावळ) येथे मनशक्ती केंद्राच्या पुढे सदर अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मोटार सायकल (क्र. यु.पी. 32 एन.के. 8202) व डंपर (क्र. एम.एच. 14/4567) यांच्यात धडक झाली.
जुन्या मुंबई महामार्गावर मुंबई पुणे लेनवर झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार मोहम्मद हमजा खान (वय 20 वर्षे, रा. सरफराजगंज, लखनऊ, उत्तरप्रदेश) हा व मोटार सायकलवर त्याचे मागे बसलेली मुलगी सायमा चांद पाशा शेख (वय 20 वर्ष, रा. कोरीगल्ली, लातूर) असे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारास महावीर हॉस्पीटल, कामशेत येथे अॅम्ब्युलन्सने आणले असता मोटार सायकल स्वार मोहम्मद हमजा खान हा उपचारापुर्वीच मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहे.



