तळेगाव दाभाडे : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून १८ जागांसाठी तब्बल १४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. रात्री उशिरापर्यंत या अर्जांची छाननी सुरू होती. छाननी नंतर गुरुवारी (दि. २०) अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर खरे निवडणुकीचे चित्र सामोरे येणार असले तरी विविध राजकीय पक्षांनी पॅनल तयार करण्यासाठी आत्ताच सुरुवात केली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका.
राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गट एकत्र आहेत तर भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची सत्ता आहे. याच पक्षांचे उमेदवार बाजार समितीच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असताना आगामी काळातील होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका एकत्र लढण्यासाठी हे राजकीय पक्ष पॅनल तयार करण्याच्या तयारीत आहेत त्यातच १८ जागांसाठी १४७ अर्ज दाखल झाल्यामुळे राजकीय नेत्यांना उमेदवारांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातच कृषी पतसंस्था मतदारसंघाच्या ११ जागांसाठी सर्वाधिक ९० तर ग्रामपंचायत मतदार संघाच्या ४ जागांसाठी ४७ अर्ज आलेले आहेत. व्यापारी व आडते मतदारसंघाच्या २ जागांसाठी ८ तर हमाल व तोलारी मतदारसंघाच्या १ जागेसाठी २ अर्ज आले आहेत.
राजकीय हस्तक्षेपाची चर्चा ?
बुधवारी अर्ज छाननी करण्याची प्रक्रिया सुरू असताना ठराविक उमेदवारांच्या अर्जात त्रुटी होत्या काही ठिकाणी सह्या केलेल्या नव्हत्या यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी सह्या घेऊन या नाहीतर तुमचा अर्ज बाद होईल असे सांगून उमेदवारांना सह्या आणायला सांगितल्या यामुळे छाननी प्रक्रिया लांबली. निवडणूक निर्णय अधिकारी कोणाच्या राजकीय दबाव पोटी काम करत आहेत का? विशिष्ट उमेदवारांना मार्गदर्शन का करत होते ? अशा अनेक प्रश्नांवर कार्यालयाबाहेर दबक्या आवाजात चर्चा होती.
सहकार क्षेत्र तसेच मावळच्या जडणघडणीतील सहकाराचा वाटा हा मोठा आहे. अनेकांची राजकीय स्वप्ने या सहकाराच्या मार्गातूनच साकार झाली आहे. परंतु कोरोना महामारीनंतर प्रथमच होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षाचे नेते सक्रिय झालेले दिसत आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये घडणाऱ्या घटनांचा यावर परिणाम होत असून विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यातील सहकार क्षेत्र आपल्या हातात ठेवायचे असून सहकारातून होणारा विकास मतदारांची मनधरणी व समाज उपयोगी कामे यामुळेच सहकार हा राजकारणात जाण्यासाठी राजमार्ग आहे असे जाणकार सांगतात.




