पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंगरोडचा प्रकल्प हाती घेतला आहे. रिंगरोडसाठी जमिनी ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनाचे काम लवकर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली.
“मी विरोधी पक्षात असूनही रिंगरोडचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. अधिकाऱ्यांना भूसंपादनाचे काम लवकर करा असे सांगितले होते. पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांतील वाहतूक कोंडी कमी होण्यास रिंगरोडमुळे मदत होणार आहे. नगर, सोलापूर, नाशिक, शिर्डी, सातारा आदी जिल्ह्यांत जाणारी वाहने या रिंगरोडवरून जातील. पर्यायाने शहरातील वाहतूक कमी होईल.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रिंगरोडचे काम लवकर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच दर आठवड्याला ते या कामांचा आढावा घेत होते. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन शिंदे- फडणवीस यांचे सरकार आले आहे. पवार हे विरोधी पक्षात असूनही रिंगरोडसाठी भूसंपादन लवकर करा, अशी मागणी केली आहे. पुणे रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्पे आहेत.
रिंगरोड एकूण लांबी सुमारे 173 किलोमीटर इतकी आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी एकूण 10 हजार 520 कोटी तर रिंगरोडच्या बांधकामांसाठी 17 हजार 723 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या जिल्ह्यातील रिंगरोड प्रकल्पासाठी 3 हजार 500 कोटींचे कर्ज हुडकोकडून उभारण्यात येणार असून हा कर्जाला शासनाने हमी सुद्धा दिली आहे. तरीही भूसंपादनाबाबत विशेष गती मिळालेली नाही.
मेट्रोसह प्रकल्पांचा आढावा घ्यावा…
मेट्रोचे काम युद्धपातळीवर करावे, अशी मागणी पवार यांनी केली. ते म्हणाले की, रिंगरोड, मेट्रो अशा महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी आहे, अशांनी दर आठवड्याला कामाचा आढावा घेतला पाहिजे. काम कुठेपर्यंत आले आहे, का थांबले आहे. या सर्वांचा आढावा घेऊन प्रकल्पाला गती दिली पाहिजे.




