पिंपरी, १२ एप्रिल :- देशाच्या जडणघडणीमध्ये महामानवांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्याकडे केवळ जातीधर्माच्या सीमित दृष्टीकोनातून न पाहता त्यांनी देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी तसेच तळागाळातील प्रत्येक समाजासाठी जे कार्य केले आहे ते समजून घेणे गरजेचे आहे. समाज परिवर्तनासाठी आणि प्रगतीसाठी आपल्या मनात महापुरुषांच्या विचारांचा वारशाचा वैचारिक पाया अधिक मजबूत करून त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केले.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ ते १५ एप्रिल २०२३ दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधनपर्वाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर उपस्थित होते. यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकर बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा विचार प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक डॉ. पवन साळवे, उप आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कनिष्ठ अभियंता तथा संयोजक विजय कांबळे, चंद्रकांत पाटील, राजदीप तायडे, माजी नगरसदस्या सुलक्षणा धर, चंद्रकांता सोनकांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, संतोष लोंढे, अॅड गोरक्ष लोखंडे, सतिश दरेकर, माजी कार्यकारी अभियंता शरद जाधव, सामाजिक कार्यकर्ते अण्णा कुदळे, प्रल्हाद कांबळे, बापूसाहेब गायकवाड, धम्मराज साळवे, विनोद गायकवाड संतोष शिंदे, संतोष जोगदंड, अॅड. मिलिद कांबळे, निलध्वज माने यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामानवांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी कौतुक केले. प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून मनमेंदू मजबूत होतात. आणि सदृढ समाज घडण्यासाठी देखील मदत होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राला महापुरुषांची परंपरा आहे. या परंपरेचा वारसा प्रत्येक महापुरुषांनी एकमेकांना दिला. महापुरुषांनी देशाच्या नागरिकासाठी स्वतःचे आयुष्य वेचले आहे. परंतु, समाजातील लोक त्यांच्याकडे जातीय दृष्टीकोनातून पाहतात. हा दृष्टीकोन बदलून महापुरुषांनी समाजासाठी केलेले कार्य आणि जीवन प्रवास समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांचा खरा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला एकसंध केले. अठरा पगड जाती, विविध संस्कृती, परंपरा याचा सुंदर मिलाफ या माध्यमातून झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी केली जाते ही प्रत्येक भारतीयाचा एक प्रकारे सन्मान आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार या प्रबोधन पर्वातून होत आहे. महापालिका अशा उपक्रम आयोजनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या महामानवांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. आपण जेव्हा भारतीय संविधानाचा सखोल अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळते की बाबासाहेबांचा सम्यक दृष्टीकोन किती व्यापक होता. अशा महापुरुषांची विचारधारा समाजात रुजविणे गरजेचे असून या चळवळीत तरुण पिढीने सहभागी झाले पाहिजे.
कार्यक्रमात स्वागतपर मनोगत डॉ. पवन साळवे यांनी केले. प्रास्ताविक उपआयुक्त रविकिरण घोडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले.
दरम्यान, डॉ. किशोर वाघ यांचा “वामनाचा जथा” हा परिवर्तनवादी विचारधारेवर आधारित समाजप्रबोधन कार्यक्रम पार पडला. मैना कोकाटे यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.




