पिंपरी : कोरोना व नंतर राज्यातील सत्तापालटामुळे त्या रखडल्या होत्या. परिणामी, पिंपरी-चिंचवडसह मावळसारख्या ‘क्रीम पोस्टिंग’ समजल्या जाणाऱ्या या पदावरील अधिकाऱ्यांना एक वर्षाचा बोनस मिळाला होता. यात मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची थेट चंद्रपूरला धानोरा येथे बदली केली गेली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे बर्गेंविरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे त्यांची शिक्षा समजल्या जाणाऱ्या ठिकाणी बदली झाल्याचा दावा मावळचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केला. त्यामुळे मावळ तालुक्यात माजी आमदार बाळा भेगडे यांचा दरारा सुरू झाला असल्याची चर्चा नावा तालुक्यात सुरू झाली आहे.
बदली झालेल्या तहसीलदारांना फक्त पाचच दिवसांत म्हणजे १७ एप्रिलपर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, बदली रद्दसाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास ती गैरवर्तणूक मानून त्याप्रकरणीही सबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे महसूल विभागाने बदली आदेशात म्हटले आहे. तसेच बदली झालेल्या अधिकाऱ्यांची रजाच मंजूर केली जाणार नाही. त्यामुळे बदलीच्या विरोधात त्यांना रजेवरही जाता येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांची सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्य दंडाधिकारी (सेतू) या पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. अर्चना विठ्ठल निकम या आल्या आहेत. तर, मावळात तहसीलदार म्हणून विक्रम देशमुख हे आले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात भेगडे यांनी मावळ तहसीलदार कार्यालयात ‘स्टिंग ऑपरेशन’ करीत तेथे चालणारी एजंटगिरी उघडकीस आणली होती. त्यानंतर त्यांनी तहसीलदार बर्गेंना त्याबद्दल धारेवर धरले होते. याच सुप्त संघर्षातून भेगडे यांनी बदलीसाठी हालचाली केल्या आहेत का? याचीही चर्चा आहे. त्यामुळे मावळात पुन्हा आजी माजी आमदार यांच्यात संघर्ष वाढणार का अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.




