पिंपरी : बेटिंग आणि सट्टा यासाठी पिंपरी केंद्र म्हणून पुढे येत आहे. जुगार आणि सट्टा बाजारातील मोठ्या बुकी पिंपरी मधून सूत्रे हलवत असतात. पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील एक आठवड्यात तीन ठिकाणी छापे मारले. आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असताना केलेल्या या कारवायांमध्ये पोलिसांच्या हाती अवघा काही हजारांचा ऐवज लागला आहे.
पिंपरी परिसरात रिव्हर रोड येथे आठ एप्रिल रोजी एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट बेटिंगवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली. तर त्या दोघांकडून 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हे दोघेजण मोबाईल फोनवरून बेटिंग घेत होते. मुंबई विरुद्ध चेन्नई या आयपीएल सामन्यावर बेटिंग सुरु असताना पोलिसांनी कारवाई केली होती.
त्यानंतर 11 एप्रिल रोजी लिंक रोड, चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने क्रिकेट बेटिंग प्रकरणी एक कारवाई केली. यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 85 हजार 25 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या दिल्ली कॅपिटल विरुद्ध मुंबई इंडियन या आयपीएल सामन्यावर आरोपी फोनवरून बेटिंग घेत होते.
क्रिकेट बेटिंग प्रकरणी पिंपरी पोलिसांनी 12 एप्रिल रोजी डीलक्स चौक, पिंपरी येथे कारवाई केली. 12 एप्रिल रोजी रात्री राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग हा आयपीएल क्रिकेटचा सामना होता. या सामन्यावर पिंपरी येथे बेटिंग घेतली जात होती. तिघांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
लाखोंची उलाढाल पण पोलिसांना मिळतो अवघा हजारोंचा ऐवज
बेटिंग प्रकरणात लाखो रुपयांची उलाढाल होते. बेटिंग घेणाऱ्या बुकिंना ग्राहक फोनवर संपर्क करतात. लाखो रुपये क्रिकेट सामन्यावर लावले जातात. पण छापा मारते वेळी पोलिसांना संगणक, मोबाईल असा काही हजारांचा ऐवज सापडतो. त्यामुळे बुकींना अटक केली तरी त्यांचे नेटवर्क ऑनलाईन असल्याने बेटिंगवर पोलिसांच्या कारवाईचा काही फरक पडलेला दिसत नाही.
मोठे मासे गळाला लागतील का
पिंपरी येथील बुकिंचे आंतरराज्य आणि त्याही पलीकडे धागेदोरे असण्याची शक्यता आहे. छापा मारल्यानंतर काहींना अटक, मुद्देमाल जप्त करण्यापलीकडे फारशी कारवाई होत नसल्याचे आजवरच्या कारवाईवरून दिसते. पोलिसांनी कसून तपास केला असता मोठी धेंडे गळाला लागण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखा युनिट दोनने केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांना मोठ्या रॅकेटचे कनेक्शन लागले असल्याची चर्चा आहे.




