पिंपरी : राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर अधिवेशनांमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवारांनी अनेक प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरलं. पण या काळात त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर काहीशी सावधपणे टीका केली. ते संरक्षणात्मक टीका करताना दिसले. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दुजोरा दिला. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
“अजित पवार माझ्यावर सावधपणे टीका करतात” या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेबद्दल विचारलं असता अजित पवारांनी मिश्किल विधान केलं आहे. सभागृहात आम्ही एकमेकांची गचांडी धरावी का? असं तुम्हाला वाटतं का? असं विधान अजित पवारांनी यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ‘सकाळ’ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
राजकीय जीवनात तुमचे कुणाबरोबर कसेही संबंध असू शकतात. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मैत्री होती. दोघं एकमेकांना भेटायचे. एकमेकांकडे जेवायला जायचे. हे आम्ही स्वत: बघितलं आहे. पण ज्यावेळी ते पक्षासाठी सभा घ्यायचे, तेव्हा दोघं एकमेकांवर तुटून पडायचे. शरद पवारांना बाळासाहेब ठाकरेंनी काय उपमा दिली होती, ते आपण ऐकलं आहे. शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंना छातीच्या बाबतीत काय उपमा दिली होती? हेही तुम्ही ऐकलं आहे, हे राजकीय जीवनात चालत असतं असे पवार यांनी म्हटले आहे.




