मुंबई : सौदी अरेबीयानंतर भारतातही ईदचा चंद्र दिसला आहे, त्यामुळे देशभरात उद्या म्हणजेच 22 एप्रिल रोजी ईद-उल-फित्र साजरी होणार आहे. चंद्रदर्शनानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वजण एकमेकांचे अभिनंदन करत आहेत. चंद्रदर्शनानंतर सौदी अरेबिया आणि आखाती देशांमध्ये ईद साजरी केली जात आहे. शिया चंद समितीने यासंदर्भात घोषणा केली आहे.
समितीने शुक्रवारी ईदचा चंद्र दिसल्याचे सांगितले. ईद-उल-फित्र हा सण रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. ईद-उल-फित्रला मिठी ईद असेही म्हणतात. इस्लामिक कॅलेंडरचा दहावा महिना शव्वालच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो.
जगभरातील मुस्लिम समुदाय रमजानच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी करतात. यामध्ये सेवाभावी कामे केली जातात. यामध्ये गरिबांना अन्नदानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोकं नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना मिठी मारतात. रोजाचा महिना ईदच्या सणाने संपतो.
बंधुभावाचे प्रतिक आहे ईद उल फित्र
मुस्लिमांचा हा सण बंधुभावाचे प्रतीक आहे. या दिवशी लोक शांती, सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. ईदचा हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिजरी दिनदर्शिकेनुसार ईदची तारीख वर्षानुवर्षे बदलते. हे कॅलेंडर चंद्रावर आधारित आहे. यामध्ये चंद्राच्या वाढत्या आणि कमी होणाऱ्या गतीनुसार दिवस मोजले जातात.



