लोणावळा : काश्मिर हा प्रश्न हा भूराजकीय प्रश्न आहे. तो सोडवायचा असेल तर तेथील भूगोल समजून घ्यायला हवा असे मत ज्येष्ठ पत्रकार व काश्मिर खोऱ्याचा दहा वर्षाहून अधिकार काळ अभ्यास करणारे संरक्षण पत्रकार विनायकराव परब यांनी व्यक्त केले. काश्मीर, चीन व भारत या विषयावर ते बोलत होते.
लोणावळ्यात रविवार दि. 23 एप्रिल पासून वसंत व्याख्यानमाला सुरु झाली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प परब यांनी त्यांच्या व्याख्यानातून गुंफले. काश्मिर, पाकिस्तान, चीन व भारत या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी काश्मिरचा भूभाग कसा आहे हे दाखविण्यासाठी दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी स्वतः टिपलेली काही छायाचित्र दाखवली.
वसंत व्याख्यानमालेला विनायक परब यांच्या हस्ते देवी सरस्वतीचे पूजन व दीपप्रज्वलन करत सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव भोंडे, वसंत व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष प्रमोद देशपांडे, उपाध्यक्षा चित्रा जोशी हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विनायक परब म्हणाले काश्मिर हा बर्फाळ प्रदेश असला तरी पुर्वी याठिकाणी तेहतिस नावाचा एक महाकाय समुद्र होता. आणि हा तेहतिस नावाचा समुद्र जमिनीखालील हालचालीत गिळंकृत होऊन हिमालयाची निर्मिती झाली. हा समुद्र रेतीचा असल्याने हिमालय हा सर्वात उंचीचा असला तरी तो रेतीचा असल्याने ठिसूळ आहे. या भागातील तापमान हे उणे 30 ते 60 आहे. जमिनीपासून 17 ते 18 हजार फुट उंचीवर आपले भारतीय सैन्य रक्षणासाठी तैनात असतात. काश्मिर प्रांतावर पाकिस्तान हक्क सांगत आहे तर दुसरीकडे चीन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असून भारत हा प्रांत आपल्या ताब्यात ठेवण्याचा सर्वंकष प्रयत्न करत आहे. काश्मिर हा प्रश्न जसा भौगोलिक आहे तसा तो राजकीय देखील आहे. 1984 नंतर तो जागतिक पटलावर अधिक प्रखरतेने चर्चिला गेला असला तरी अद्यापि सुटलेला नाही असे विनायक परब यांनी उपस्थित श्रोत्यांना समजावून सांगितला.




