पिंपरी :- भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “फ्रीडम टू वॉक – सायकल – रन” या मोहिमेतील पहिल्या भागात देशपातळीवर यश संपादन करणा-या अधिकारी कर्मचा-यांचा प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.
सत्कारार्थींमध्ये शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, कनिष्ठ अभियंता अमित दिक्षीत, स्वप्निल शिर्के आणि संगणक चालक अनंत चुटके यांचा समावेश आहे. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या समारंभास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त आधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्यासह सर्व उपआयुक्त, सह शहर अभियंता, सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
यात पिंपरी चिंचवड शहराने देखील आपला सहभाग नोंदविला होता. या शहरातून एकूण १० सिटी लिडर्सने यात सहभाग नोंदविला आहे. या पूर्ण उपक्रमाच्या शेवटी दि. १९ एप्रिल २०२३ रोजी या उपक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पिंपरी चिंचवड शहर सायकलिंग आणि रनिंग मध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर व तसेच चालण्यात १० व्या क्रमांकावर आले. तसेच वैयक्तिक पातळीवर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता अमित दिक्षीत हे सायकलिंग मध्ये देशात प्रथम क्रमांक व संगणक चालक अनंत चुटके यांनी चौथा क्रमांक पटकावला. तसेच रनिंगमध्ये कनिष्ठ अभियंता प्रसाद देशमुख यांचा देशात द्वितीय क्रमांक व स्वप्निल शिर्के यांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे.




