पिंपरी ; पिंपरी चिंचवड शहरामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. याबाबतच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये पाणीपुरवठा विभागाकडे पाचशेहून अधिक तक्रारी आल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत शहरातील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. पुरेसे पाणी नागरिकांना देण्यात प्रशासनाला अपयश येत असतानाच केवळ नेत्यांच्या अनास्थेमुळे नागरिकांना अतिरिक्त पाणीही मिळत नाही. त्यामुळे भरउन्हाळ्यात नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे.
शहरामध्ये गेल्या सव्वातीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पवना धरणामधून ५१० तसेच एमआयडीसीकडून ३० असे ५४० एमएलडी पाणी शहराला पुरवले जाते. शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात गेल्याने एवढे पाणी नागरिकांना पुरत नाही. तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होते. परिणामी शहराच्या काही भागांमध्ये पुरेसा दाबाने पाणीपुरवठा होत नाही, तसेच काही ठिकाणी पाणी पोहचत नसल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. नागरिकांच्या पाण्याच्या तक्रारी वेळेत सोडवण्यासाठी प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे, तसेच ‘सारथी’वर पाण्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असतात.
मात्र, या तक्रारी सोडवण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे समोर आले आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये हेल्पलाइनवर २४९ नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. सारथीवर २८८ अशा ५३७ तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत, तसेच बहुतांश भागामध्ये पाणीटंचाई असूनही नागरिक तक्रार करण्यास समोर येत नाहीत. पाण्याची टंचाई असतानाही तक्रारी सोडवण्यात पालिकेतील सुस्त अधिकाऱ्यांमुळे अपयश येत आहे.




