पिंपळे गुरव : महापालिका हद्दीतील बहुतांश भागात पाण्याची मोठी समस्या आहे. सांगवी भागात देखील मागील काही दिवसांपासून कमी दाबाने आणि अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने सांगवीकर हैराण आहेत. जुनी सांगवी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात नागरिकांना पिण्याचे पाणी नसल्याने गैरसोय होत आहे.
वातावरणातील सततच्या बदलामुळे कधी ऊन, कधी वारा तर कधी पाऊस येत असल्याने नागरिकांच्या शरीरावर परिणाम होत आहे. वाढत्या उकाड्याचा त्रास कमी करण्यासाठी सकाळी व सायंकाळी उद्यानात बाळ गोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांची फेरफटका मारण्यासाठी मोठी वर्दळ असते. पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना घरातूनच पाण्याची बाटली सोबत ठेवावी लागत आहे. मुळा नदी किनारा उतारावर शेवटचे टोक असूनही सध्या कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे उद्यानातील ठेवण्यात आलेल्या टाक्यात पाणी भरत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
मागील काही दिवसांपासून जुनी सांगवीतील बहुतांश भागामध्ये पाणीपुरवठा कोणत्या ना कोणत्या कारणाने विस्कळीत होत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना जार बाटलीबंद पाण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करून तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने येथील पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




