पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा विलगीकरण करून द्यावा आणि शहर कचरामुक्त दिसावे यासाठी शहरातील कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. तरीदेखील काही नागरिक व व्यावसायिक कचरा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. फ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य पथकाने मागील काही दिवसांपूर्वी टेम्पोचालकांने कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे चक्क ५० हजारांचा दंड केला आहे.
महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या कडेला, चौकांमध्ये किंवा पूर्वी ज्या ठिकाणी कंचराकुंड्या होत्या तेथे नागरिक कचरा टाकत आहेत. त्यामुळे कचराकुंड्या हटवून देखील नागरिक, व्यावसायिक, टेम्पोचालक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. अशा व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागामार्फत पथक निर्माण करून कारवाई करण्यात येत आहे.
त्यानुसारच फ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने गस्त घालत असताना चारचाकी टॅम्पो, निघोजे पुलाजवळ, तळवडे येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे दिसून आला. याबाबत लाला मशाळ, वाहनचालक यांना ५० रुपये दंड आकारण्यात आला आहे. क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहरे, आरोग्याधिकारी शांताराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फ’ क्षेत्रीय आरोग्य पथकातील रवी हाटकर, महाराष्ट्र सुरक्षा बल अमीर मुलाणी यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आहे.




