तळेगाव दाभाडे : आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी नगरसेवक संतोष भेगडे यांना शुभेच्छा देताना बिलेटेड हॅपी बर्थडे संतोष असे म्हणत वाढदिवस झाल्यानंतर तुला शुभेच्छा देतो. त्यामुळे याला इंग्लिशमध्ये बिलेटेड हॅपी बर्थडे असे म्हणतात असे म्हणताच उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.
संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ नानोली आयोजित भव्य ट्वेंटी-ट्वेंटी बैलगाडा स्पर्धेच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी संतोष भेगडे व आमदार सुनील शेळके यांनी वारंवार माझ्याकडे पाठपुरावा केला. राज्य सरकार, केंद्र सरकार व कोर्टाच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्वांनीच शर्तीचे प्रयत्न केले. शर्यतीच्या माध्यमातून आजही आपली संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या बैलगाडा मालकांना मी सॅल्यूट करतो. बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सुटल्यापासून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत आहे. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणेही फिटत आहे. यात्रा, जत्रा, उत्सव काळात बैलगाडा शर्यत सुरू ठेवल्याबद्दल बैलगाडा मालक मालकांचे यावेळी पवार यांनी आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे, साहेबराव कारके, सुभाष जाधव, बाबुराव वायकर, संतोष मुऱ्हे, दत्तात्रय पडवळ, चंद्रजीत वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक संतोष भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन अतुल राऊत व प्रवीण मुऱ्हे यांनी केले.




