पिंपरी – मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. कृषी उत्पन्न बाजार समितीत आपसातले तंटे बाजूला सारुन भाजपचे पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. कॉंग्रेसमध्ये फूट पाडून सर्वच्या सर्व जागा लढविल्या. परंतु निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद मिळाला नसल्याने भाजपला बाजार समिती गमवावी लागली.
मावळ बाजार समिती निवडणूक तालुक्यातील सर्वच भाजप कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन मागील गट तंटे बाजूला सारून बाजार समिती निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे कामालाही लागले होते. या निवडणुकीत घाडेबाजार होत असल्याची चर्चाही ऐकू येत होती. महाविकास आघाडीला चारीमुंढ्या चित करण्यासाठी महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचा एक गट फोडून सर्वपक्षीय पॅनेल उभे केले. एकजुटीने निवडणूक लढवीत असताना एकही भाजपचा वरिष्ठ नेता निवडणुकीकडे फिरकला नसल्याचे दिसून आले. जसे जसे मतदान जवळ येत होते तसे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या वरिष्ठ नेत्यांचा फोन येईल, अशी आशा वाटू लागली होती. परंतु मतदान संपेपर्यंत कोण्याही नेत्यांचा पदाधिकाऱ्यांना संदेश आला नाही. मतमोजणी झाली, निकाल लागला तरीही पदाधिकाऱ्याकडे पाहण्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वेळ मिळाला नाही.
गेल्या विधानसभा निवडणूकीत गड गमावला
दरम्यान सन 2019 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांनी भाजपचे आमदार माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव केला. त्यापूर्वी गेली पाच वर्षे विधानसभा ही भाजपच्या ताब्यात होती. भाजपचा गड मानला जाणाऱ्या मावळ मतदारसंघात राष्टवादीचे सुनील शेळके यांनी सुरुंग लावला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.
सरकारमध्ये सुनील शळके यांना जरी मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही तर त्याचा वरिष्ठ पातळीवर दांडगा संपर्क होता. या काळात मतदार संघात करोडो रुपयांचा निधी आणला. त्यामुळे कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीमध्ये शेळके यांनी पुन्हा एकदा पक्षाची ताकद दाखवून दिली. मावळ तालुका बाजार समिती निवडणुकीत आमदार सुनील शेळके शेवटचे काही दिवस तळ ठोकून बसले होते. त्यामुळे मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 17 जागा निवडून आणत आपली ताकद दाखवून दिली.




