तळेगाव : जनविकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणातील चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यापैकी एकाला पुणे पोलिसांनी तर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली. तर आज खुनातील पाचव्या आरोपीच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या.
रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर, नाना उर्फ संदीप मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना वडगाव मावळ येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आवारे यांची शुक्रवारी (दि. १२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींची पलायन केले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी क्राईम ब्रँचची ४ पथके रवाना केली आहेत. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोन यांच्या पथकांनी नवलाख उंबरे येथून तिघांना ताब्यात घेतले. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे पर्यंत पोलिसांची शोध मोहीम सुरू होती.




