लोणावळा : लोणावळा शहरात मागील दोन दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर रित्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोघा जणांवर कायदेशीर कारवाई करीत लोणावळा शहर पोलिसांनी दारूसह 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भरत लक्ष्मण कदम व गणेश पांडुरंग साळवे यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे .
वरील प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत शनिवार दिनांक 13 मे रोजी दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास संजीवनी हॉस्पिटल रोडवर यातील आरोपी भरत लक्ष्मण कदम (वय 36 वर्ष, रा.बारपे ता. मुळशी, जि पुणे) हा त्याच्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो कार (क्र.एम.एच.05 बी.एल.9099) मधून बेकायदा विक्रीसाठी 24 बियरच्या बाटल्या, देशी संत्रा दारूच्या 48 बाटल्या, मॅकडॉल्स दारुच्या 10 बाटल्या घेऊन चालला असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
तर दुसऱ्या घटनेत रविवारी दिनांक 14 मे रोजी दुपारी 12.55 वाजण्याच्या सुमारास गणेश पांडुरंग साळवे (वय 35 वर्ष, रा. कुसगाव, ता मावळ, जि पुणे) हा आपल्या काळ्या रंगाची अॅक्टीव्हा मोटार सायकल (क्रं. एम.एच. 14 जे डब्लु 5546) वरून इंपेरियम ब्लु नावाचे 10 बॉटल, डब क्वूमससे नावाचे 11 बाटल्या, देशी संत्रा दारूच्या 47 बाटल्या, टॅगो पंच दारूच्या 21 बाटल्या बेकायदेशीर विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांच्या ताब्यात मिळाला.
लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पो. नि. सिताराम डुबल यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो.ना.हनुमंत शिंदे, पो. कॉ. राजेंद्र मदने, मनोज मोरे यांनी या दोन्ही कारवाई केल्या. आरोपींच्या विरोधात मु.प्रो.अॅक्ट क.65 (ई)(अ) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.




