पिंपरी : राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारला तब्बल दहा महिने पूर्ण झालेत तरीही एकही दिवस पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी भाजपने पुढाकार घेतला नव्हता. मात्र राज्यातील सत्ता संघर्ष नंतर शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ विस्ताराच्या वाटा खुल्या असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे विद्यमान तिन्ही आमदारांचे मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात आज झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या आडून आमदाराने आपापल्या समर्थक शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले.
सुपिम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकारला तूर्तास धोका नाही. त्यामुळे दहा महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. विविध मंडळे आणि शासकीय समितीचा मार्ग मोकळा झाला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे आणि आमदार अश्विनी जगताप यांच्यापैकी कोणाला मंत्रिपद मिळणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन आज सोमवारी राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थित होते. यावेळी मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत शहरातून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागली आहे.
दरम्यान महापालिकेत २०१४ च्या निवडणुकीत चिंचवडमधून भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड तर भोसरीतून अपक्ष म्हणून महेश लांडगे यांनी विजय मिळविला. लांडगे यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत लांडगे- जगताप जोडीमुळे महापालिकेत सत्ता आली. या कालखंडात भाजपाचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरावर लक्ष केंद्रित केले. खासदार अमर साबळे यांना राज्यसभेवर संधी दिली. त्यानंतर सचिन पटवर्धन यांना लोकलेखा समितीचे अध्यक्षपद आणि ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे यांना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद दिले. तसेच त्यानंतर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे यांची निवड केली. तर उमा खापरे यांना राज्याच्या महिला अध्यक्षपदी नियुक्त केले. त्याचबरोबर पीएमआरडीए, साहित्य संस्कृती मंडळ, चित्रपट महामंडळ, क्रीडा आणि कला समितींवर शहरातील कार्यकर्त्यांची निवड केली. महापालिकेतही जुन्या नव्यांचा मेळ साधत महापौर, स्थायी समितींवर कार्यकर्त्यांना संधी दिली होती.
एकनाथ शिंदे गटाचे पिंपरी- चिंचवड शहरात खासदार श्रीरंग बारणे आहेत. शिवसेनेतील बारणे यांचा गट शिंदे यांच्याबरोबर आहे. त्यांचा शहरात एकही आमदार नसला तरी, विविध राज्यांच्या समितीवर संधी मिळू शकते. २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेत मतभेद झाले. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तरी विविध मंडळांवर निवडी करण्यात आलेल्या नव्हत्या. सत्ता असूनही पदे न दिल्याने शहरातील नेते आणि कार्यकत्यांमध्ये कमालीची नाराजी होती. महापालिका निवडणुकीची चर्चा होत असतानाच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेपासून दूर होत शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. मात्र, कायदेशीर पेच निर्माण झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता.




