लोणावळा : टायगर पॉईंट परिसरात फिरायला गेलेला पर्यटक त्याच्या गाडीसह खोल दरीत पडलेल्या अवस्थेत असताना घटनेची खबर मिळताच तातडीने घटनास्थळाचा शोध घेऊन त्या जखमी व्यक्तीला वेळीच बाहेर काढण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश मिळाल्याने संबंधित व्यक्तीचा जीव वाचला. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजण्याची सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे फोनवर मुंबई येथून एका महिलेने फोन करून सांगितले की तिचे पती हे टायगर पॉईंट परिसरात फिरायला गेले असताना ते त्यांचे गाडीसह खोल दरीत गेलेले आहेत त्यांना मदत करा. सदरची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी तात्काळ सदरची माहिती उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक आयपीएस तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना कळवून लागलीच सोबत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर धनवे यांना घेऊन टायगर पॉईंट परिसरात गाठला.
त्याठिकाणी स्थानिक दुकानदारांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे दरीत पडलेल्या गाडीचा शोध घेतला असता सायंकाळी साडेसहा वाजण्याचे सुमारास लोणावळा येथील टायगर पॉईंट परिसरातील घुबड तलावाचे जवळ असलेले अंदाजे 60 ते 65 फूट खोल दरीत एक गाडी पडलेली दिसली. पो.उप.नि. भोसले यांनी स्वतः दरीत उतरून दरीत पडलेल्या गाडीतील गौरव ठक्कर (रा. मुंबई) यांना बाहेर काढले. ते जखमी झालेला असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून, टायगर पॉईंट येथील दुकानदार यांचे मदतीने पाठीवर उचलून दरीतून वरती काढून पुढील उपचारासाठी लोणावळा येथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
घडलेला प्रसंग हा इतका भयानक असताना देखील पो.उप.नि. भोसले यांनी प्रसंग अवधान राखून स्वतःचा जीव धोक्यात घालून दरीत उतरून जखमीस वेळीच गाडीतून बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. सदरची कामगिरी ही आयपीएस सत्यासाई कार्तिक व वरिष्ठ पो. नि. किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पौ.उप.नि. भारत भोसले, पोलिस कॉन्स्टेबल सागर धनवे, पोलीस नाईक हनुमंत शिंदे व टायगर पॉईंट येथील जवान विकास आखाडे, मारुती हिरवे, सागर मरगळे यांनी केली.




