मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवरच शिरुर लोकसभा मतदारसंघातून 2024 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण असणार? याबाबतची अनेकांना उत्सुकता आहे. खासदार कोल्हे हे भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा आहेत तर त्यांनी एका कार्यक्रमात लोकसभा लढवावी का नाही याबाबत सध्या कोणताही निर्णय नाही असा इशारा दिल्यामुळे या शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून डॉ.अमोल कोल्हे आणि दिलीप वळसे पाटील यांची नावे चर्चेत असल्याची माहिती सुत्रांकडून समजती आहे.
यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी या मतदारसंघातून लोकसभा लढवावी, असा आग्रह अनेकांचा होता. पण त्यांनी लढवली नव्हती. मात्र, आता 2024 च्या लोकसभेला त्यांनी शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा त्यांना आग्रह असल्याचं बोललं जात आहे. पण याबद्दल ते काय भूमिका घेतात? ते महत्वाचं असणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, त्यांनी या सर्व चर्चा फेटळल्या होत्या. याच चर्चांमुळे दिलीप वळसे पाटील यांचं नाव या मतदारसंघातून समोर येत तर नाही ना? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गुडघ्याला बाशिंग लावून भोसरीतील एक बडा नेता खासदारकीसाठी पुन्हा मैदानात उतरला असल्याचे त्यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या शक्ती प्रदर्शनावरून दिसून येत आहे. मात्र त्याच्या नावाची राष्ट्रवादीच्या बैठकीत काहीही चर्चा झालेली नाही.




