- देहूत निर्मल वारीच्या नावाखाली ठेकेदारांची मनमानी
पुणे : आषाढी वारीसाठी तीर्थक्षेत्र देहू येथून श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर दरम्यान ठिकठिकाणी स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेकडून भाविक वारकऱ्यांसाठी स्वच्छता अभियान राबविले जाते. वारकऱ्यांच्या सोयींसुविधा साठी प्रतिवर्षी प्रमाणे फिरत्या शौचालयांची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्यामुळे काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आषाढी वारीच्या साठी अडचणी निर्माण होताना दिसत आहेत यासाठी आत्ता सुरू असणारे विविध प्रक्रिया तातडीने रद्द करून मागील वर्षी सहभागी झालेल्या ठेकेदारांना निर्मल वारीचे नियोजन करण्यास अध्यादेश जिल्हा परिषदेकडे द्यावेत अशी मागणी वारकरी समुदायाकडून होताना दिसत आहे.
देहू ते पंढरपूर दरम्यान असणाऱ्या लाख्खो भाविक वारकऱ्यांच्या सोयीं सुविधा साठी प्रतिवर्ष फिरत्या शौचालयांची निविदा पुणे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत असते. फिरत्या शौचालयाचे निविदेमध्ये असणारे अटी शर्ती अनुषंगाने निविदा प्रक्रिया पार पडत असते. मात्र निविदेतील सर्वच कंपन्या निविदा अटीशर्तीच्या कचाट्यात सापडल्यामुळे सदर निविदेची कोणतीही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आषाढी वारी आठवडयाभरावर येऊन ठेपली असताना देखील सहभागी कंपन्यांना जिल्हा परिषदेकडून कोणताही आदेश दिलेला नाही. याबाबत जिल्हा परिषदेचे स्वच्छता विभागातील सीईओ वाघमारे साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे काही दिवसावर येऊन ठेपलेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या निर्मल वारीची निविदा कचाट्यात अडकली आहे. ठेकेदारांच्या अंतर्गत असणाऱ्या वादामुळे निर्मल वारी कागदी प्रक्रियेत अडकणार का? असा सवाल भाविक वारकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची अडचण अथवा होणारी गैरसोय होण्याऐवजी व कायदेशीर कचाट्यात संपूर्ण काळ न घालवता निविदेत सहभागी झालेल्या सर्वच कंपन्यांना त्यांच्या योग्यतेनुसार काम वाटून दयावे व निर्मलवारी सुरळीतरित्या पार पाडावी अशी मागणी होताना दिसत आहे.
देहूत निर्मल वारीच्या नावाखाली ठेकेदारांची मनमानी

जिल्हा परिषदेने अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण केली नसताना देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील गायरान जागेवर दिल्लीतील एका ठेकेदारांनी मनमानी कारभार करीत फिरते शौचालयाचे साहित्य आणून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती देहू नगरपंचायत प्रशासनालाही नाही.
देहू आळंदी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या सोयीसुविधासाठी फिरते स्वच्छतागृह ,शौचालय यांचे नियोजन जिल्हा परिषदेकडून होत असते. त्या निविदा प्रक्रिया संदर्भातील माहिती जिल्हा परिषद देऊ शकेल.
डॉ प्रवीण निकम
देहू नगरपंचायत,प्रकारी मुख्याधिकारी.




