लोणावळा : महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरण विभागामार्फत आयोजीत माझी वसुंधरा 3.0 स्पर्धेत 50 ते 1 लाख लोकसंख्या या गटात लोणावळा शहराने संपूर्ण राज्यातून दुसरा क्रमांक पटकावून चार कोटीचे बक्षीस प्राप्त केले. याशिवाय वायू, जल, अग्नी आणि भूमी या चार तत्वांपैकी भुमी या तत्वात संपूर्ण राज्यात सर्वप्रथम येत दीड कोटी रुपयांचे पारितोषीक पटकावले.
लोणावळा नगरपरिषदेने एकूण 5.5 कोटीचे पारितोषिक पटकावून दुहेरी मुकूट परिधान केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहूल नॉर्वेकर तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि पर्यावरण व वातावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांचे शुभहस्ते हा पुरस्कार लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीमती सुरेखाताई जाधव, माज़ी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांनी स्वीकारला. या दुहेरी यशाबद्दल व सलग दुस-या वर्षीही सातत्य राखलेबद्दल संपूर्ण शहरातून अभिनंदनाचा वर्षाव लोणावळा नगरपरिषदेवर होत आहे.




