पंढरीसी जा रे आल्यानी संसारा। दीनांचा सोयरा पांडुरंग १॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ ||२||… जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढीवारीसाठी शनिवारी (दि. १०) प्रस्थान ठेवले. टाळ, मृदंग आणि खांद्यावर पताका घेऊन ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. तीर्थक्षेत्र देहूतील मुख्य मंदिराच्या भजनी मंडपामध्ये दुपारी सव्वादोनच्या सुमारास लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ण तुकोबांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. वारीचे हे ३३८ वे वर्ष आहे. आज रविवारी सायंकाळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे.
दुपारी साडेबाराच्या सुमारास सोळके (म्हसलेकर) यांनी पादुका डोक्यावर घेऊन टाळ, मृदंगाच्या गजरात मुख्य मंदिरात मंदिर प्रदक्षिणानंतर भजनी मंडपात आणले. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमाला प्रारंभ झाला. देहूकर दिंडीची ज्येष्ठ वारकरी विक्रम बुवा माळवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व त्यांच्या पत्नी अंजनी, खासदार श्रीरंग बारणे, हर्षवर्धन पाटील, आमदार सुनील शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते जगद्गुरुंच्या पादुकांचे महापूजन ग्रामोपाध्याय यांनी वेदमंत्र पठण, वरुण, कलश पूजन केले. महापूजेनंतर पादुका पालखीत ठेवण्यात आल्या.
विणेकरी, दिंडीकरी यांचा मानसन्मान केल्यानंतर पालखी सोहळा पहिल्या मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला. सायंकाळी सहा वाजता पालखी इनामदार वाड्यात विसावली. रविवारी सकाळी अकरा वाजता पालखी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे.




